उभी तुळस वेल्हाळ  

Posted by यशोधरा in

कसे केंव्हा कलंडते
माझ्या मनाचे आभाळ
आणि चंद्र चांदण्यांचा
दूर पोचतो ओघळ

उरे तुडुंब तयांत
काळोखाचे मृगजळ
रितेपणाच्या डोहाची
आत ओढी उचंबळ

मंत्रविद्ध मध्यरात्र
उभी झुकून काठाशी
जन्मोजन्मीच्या दु:खाचा
राळ धरूनी उशाशी

ओढ घेऊन पाण्याची
सूर मारते सरल
एक गाठायचा तळ
आणि तळींचा अनळ

पेट घेई मध्यरात्र
पेटे काळोखाचे जळ
दिवसाच्या राखेमध्ये
उभी तुळस वेल्हाळ

-इंदिरा संत

जयोस्तुते..  

Posted by यशोधरा in

जयोस्त्तु ते श्रीमहन्मंगले। शिवास्पदे शुभदे्
स्वतंत्रते भगवति। त्वामहं यशोयुतां वंदे ।।धृ।।

राष्ट्राचे चैतन्य मूर्त तूं, नीति संपदांची
स्वतंत्रते भगवति। श्रीमती राज्ञी तू त्यांची
परवशतेच्या नभांत तूंची आकाशी होशी
स्वतंत्रते भगवती। चांदणी चमचम लखलखशी।।

गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली
स्वतंत्रते भगवती। तूच जी विलसतसे लाली
तूं सुर्याचे तेज उदधिचे गांभीर्यहि तूंची
स्वतंत्रते भगवती। अन्यथा ग्रहण नष्ट तेंची ।।

मोक्ष मुक्ति ही तुझीच रुपें तुलाच वेदांती
स्वतंत्रते भगवती। योगिजन परब्रम्ह वदती
जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर तें तें
स्वतंत्रते भगवती। सर्व तव सहचारी होते ।।

हे अधम रक्त रंजिते । सुजन-पुजिते । श्री स्वतंत्रते
तुजसाठिं मरण तें जनन
तुजविण जनन ते मरण
तुज सकल चराचर शरण
भरतभूमीला दृढालिंगना कधिं देशिल वरदे
स्वतंत्रते भगवति। त्वामहं यशोयुतां वंदे।।

हिमालयाच्या हिमसौधाचा लोभ शंकराला
क्रिडा तेथे करण्याचा कां तुला वीट आला
होय आरसा अप्सरसांना सरसे करण्याला
सुधाधवल जान्हवीस्त्रोत तो कां गे त्वां त्यजिला ।।

स्वतंत्रते । ह्या सुवर्णभूमीत कमती काय तुला
कोहिनूरचे पुष्प रोज घे ताजें वेणीला
ही सकल-श्री-संयुता आमची माता भारती असतां
कां तुवां ढकलुनी दिधली
पूर्वीची ममता सरली
परक्यांची दासी झाली
जीव तळमळे, कां तूं त्यजिले ऊत्तर ह्याचें दे
स्वतंत्रते भगवति। त्वामहं यशोयुतां वंदे।।

-स्वातंत्र्यवीर सावरकर

सागरास  

Posted by यशोधरा in

ने मजसी ने परत मातृभूमीला । सागरा, प्राण तळमळला

भूमातेच्या चरणतला तुज धूतां । मी नित्य पाहिला होता
मज वदलासी अन्य देशिं चल जाऊ । सृष्टिची विविधता पाहू
तइं जननी-हृद् विरहशंकितहि झालें । परि तुवां वचन तिज दिधलें
मार्गज्ञ स्वयें मीच पृष्टि वाहीन । त्वरित या परत आणीन
विश्वसलो या तव वचनी । मी
जगदनुभव-योगे बनुनी । मी
तव अधिक शक्त उध्दरणी । मी
येइन त्वरें कथुन सोडिलें तिजला । सागरा, प्राण तळमळला

शुक पंजरिं वा हरिण शिरावा पाशीं । ही फसगत झाली तैशी
भूविरह कसा सतत साहु यापुढती । दशदिशा तमोमय होती
गुण-सुमनें मी वेचियली ह्या भावें । कीं तिने सुगंधा घ्यावें
जरि उध्दरणी व्यय न तिच्या हो साचा । हा व्यर्थ भार विद्येचा
ती आम्रवृक्षवत्सलता । रे
नवकुसुमयुता त्या सुलता । रे
तो बाल गुलाबही आता । रे
फुलबाग मला हाय पारखा झाला । सागरा, प्राण तळमळला

नभि नक्षत्रें बहुत एक परि प्यारा । मज भरतभूमिचा तारा
प्रासाद इथे भव्य परी मज भारी । आईची झोपडी प्यारी
तिजवीण नको राज्य, मज प्रिय साचा । वनवास तिच्या जरि वनिंच्या
भुलविणें व्यर्थं हें आता । रे
बहु जिवलग गमतें चित्ता । रे
तुज सरित्पते । जी सरिता । रे
तद्विरहाची शपथ घालितो तुजला । सागरा, प्राण तळमळला

या फेन-मिषें हससि निर्दया कैसा । का वचन भंगिसी ऐसा
त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते । भिउनि का आंग्लभूमीतें
मन्मातेला अबल म्हणुनि फसवीसी । मज विवासनातें देशी
तरि आंग्लभूमी-भयभीता । रे
अबला न माझिही माता । रे
कथिल हें अगस्तिस आता । रे
जो आचमनी एक पळीं तुज प्याला । सागरा, प्राण तळमळला

-स्वातंत्र्यवीर सावरकर

आत्मबल  

Posted by यशोधरा in

अनादि मी अनंत मी, अवध्य मी भला
मारिल रिपु जगतिं असा कवण जन्मला ।। धृ ।।

अट्टाहास करित जईं धर्मधारणीं
मृत्युसीच गाठ घालु मी घुसे रणीं
अग्नि जाळि मजसी ना खड्ग छेदितो
भिउनि मला भ्याड मृत्यु पळत सूटतो
खुळा रिपू । तया स्वयें
मृत्युच्याचि भीतिने भिववु मजसि ये ।। १ ।।

लोटि हिंस्र सिंहाच्या पंजरी मला
नम्र दाससम चाटिल तो पदांगुला
कल्लोळीं ज्वालांच्या फेकिशी जरी
हटुनि भंवति रचिल शीत सुप्रभावली
आण तुझ्या तोफांना क्रूर सैंन्य तें
यंत्र तंत्र शस्र अस्र आग ओकते
हलाहल । त्रिनेत्र तो
मी तुम्हांसि तैसाची गिळुनि जिरवितो ।। २ ।।

-स्वातंत्र्यवीर सावरकर

विझवून दीप सारे ...  

Posted by यशोधरा in

विझवून दीप सारे मी चाललो निजाया
आता अशाश्वताची उरली मुळी न माया

मी पाहिले तयाचे वेल्हाळ रंग सारे
तेव्हाच शाश्वताचे मी हेरीले इशारे

स्वर-शब्द वेचलेले शोषून सर्व प्राणीं
आजन्म ओविली मी त्यांची प्रसन्न गाणी

ध्वनी त्यांतूनी कुणी आगळा निघाला
त्याचाच छंद आता या लागला जिवाला

खेळून सर्व नाती उरलो पुन्हा निराळा
लंघून राहिलो मी माझ्याही संचिताला

मिळूद्या मला मुळाशी सारी मिटून दारे
मोकाट वारियांनो थोडे मुकाट व्हारे

- बा.भ. बोरकर

पूरिया  

Posted by यशोधरा in

दूर कुठे राऊळात दरवळतो पूरिया!
सांजसमयी दुखवितात अंतरास सूर या!
असह्य एकलेपणा, आस आसवी मिळे
काय अंतरात ते अजून ना कुणा कळे
झाकळून जाय गाव, ये तमास पूर या!
दूर वास रे तुझा, ध्यास लागला मनी
दृष्टीभेटही नसे, काय सांगणे जनी
एकवार तूच ये सखीस धीर द्यावया!
सलत सूर सनईचा, वारियात कापरा
सुकून पाकळी मिटे, मुग्ध भाव लाजरा
फुलात गंध कोंदला, वाट ना उरे तया!

- ग. दि. माडगूळकर

अनय  

Posted by यशोधरा in

नक्षत्रांच्या गावातून उतरली होतीस तू त्याच्या घरात;
मेघश्याम आभाळाची ओढ तुझ्या रक्तातच होती
हे समजलं होतं त्याला, अगदी पहिल्यापासून,
तुझ्या बाईपणाची जात विजेची, शेजेला घेता न येणारी
ओळखून होता तो आतून, आतून, खोल मनातून
तुझ्या झिळमिळ स्वप्नांच्या मोरपिसांना
त्याने कधी देऊ पाहिले नाहीत आपले डोळे,
आणि नाही गढूळ केले कधी तुझ्या देहात हिंदकळणारे
धुंदमदिर निळे तळे.

त्याच्या मृण्मय आयुष्यात उमटली होती
अमराचा अळता लावलेली तुझी पावले
घरात तुझ्या असण्याचा अविनाशी गंध होता;
काठोकाठ भरून होता तो नुसत्या तुझ्या आसपास वावरण्याने;
तुझ्याशी खोलवर कृतज्ञ होता
पाहिलं त्यानं तुला उंच बेभान उसळताना;
रात्रीच्या रसज्ञ काळ्या अंधारात मिसळताना;
मधुर विषाचे घोट खुळ्या ओठांनी आकंठ घेताना;
पिसावताना, रसावताना,
अस्तित्वाचा कण न्‌ कण
प्रेमाच्या चेहऱ्यावर उत्कट उधळून देताना.

कळली त्याला तहान तुझ्या तृप्तीला लागलेली अतृप्तीची;
दु:खाचं नख लागलेल्या काळजाची तडफड कळली शर्थीची;
कळली कशी असते प्रेमात स्त्री भरतीची आणि सरतीची.
तू हरलीस हे त्याला कळलं, पण निरर्थाच्या वाटेवर
हरवली नाहीस, स्वत्व सांभाळून उरलीस तशीच, हेही कळलं
त्यानं पुढे होऊन तुझ्या पापणीवरचा शोक टिपला,
त्या क्षणी, राधे तुला तुझा पुरुष भेटला.
पुरुष-जो क्षमा करून नाही ऋणी करत;
पाठ फिरवून नाही उणी करत;
घेतो समजून, सावरतो, आवरतो, उराशी धरतो;
आपल्या नसलेल्या स्वप्नांसाठीही आपल्या काळजाचं घर करतो.
राधे, पुरुष असाही असतो!

- अरुणा ढेरे, ’मौज दिवाळी’ २००४

राधा-कृष्णाच्या नात्यावर किती वेगवेगळ्या अंगांनी लिहिलं गेलंय, पण राधा आणि अनय? अनय हा राधेचा नवरा.

कुब्जा  

Posted by यशोधरा in

अजून नाही राधा जागी,
अजून नाही जागे गोकुळ;
अशा अवेळी पैलतीरावर,
आज घुमे का पावा मंजुळ...

मावळतीवर चंद्र केशरी,
पहाटवारा भवती भणभण;
अर्ध्या पाण्यामधे ऊभी ती,
तिथेच टाकून अपुले तनमन...

विश्वच अवघे ओठां लावून,
कुब्जा प्याली तो मुरलीरव;
डोळ्यांमधूनी थेंब सुखाचे,
हे माझ्यास्तव, हे माझ्यास्तव...

- इंदिरा संत

एखादी व्यक्ती किती अलवार लिहू शकते याला काही मर्यादा??

बोरकरांची कविता  

Posted by यशोधरा in

नाही पुण्याची मोजणी
नाही पापाची टोचणी
जिणे गंगौघाचे पाणी

कशाचा न लागभाग
कशाचा न पाठलाग
आम्ही हो फुलांचे पराग

आम्हा नाही नाम-रूप
आम्ही आकाश स्वरूप
जसा निळा नळा धूप

पुजेतल्या पानाफुला
मृत्यू सर्वांग सोहळा
धन्य निर्माल्याची कळा

- बा. भ. बोरकर

एकाच वाक्यात बा. भ. यांच्या काव्यप्रतिभेबद्दल बोलायचं? 'दिव्यत्वाची जेथ प्रचिती, तेथे कर माझे जुळती... ' अजून काय?

पसायदान  

Posted by यशोधरा in

आता विश्वात्मके देवे l येणे वाग्यज्ञे तोषावे ll
तोषोनी मज द्यावे l पसायदान हे ll

जे खळांची व्यंकटी सांडो l तयां सत्कर्मी रति वाढो ll
भुतां परस्परे पडो l मैत्र जीवांचे ll

दुरितांचे तिमिर जावो l विश्व स्वधर्मसूर्ये पाहो l
जो जे वांच्छील तो ते लाहो l प्राणिजात ll

वर्षत सकळमंगळी l ईश्वरनिष्ठांची मांदियाळी l
अनवरत भूमंडळी l भेटतु भूतां ll

चला कल्पतरुंचे आरव l चेतना चिंतामणीचे गाव l
बोलते जे अर्णव l पीयुषांचे ll

चंद्रमे जे अलांच्छन l मार्तंड जे तापहीन ll
ते सर्वांही सदा सज्जन l सोयरे होतु ll

किंबहुना सर्वसुखी l पूर्ण होऊनी तिही लोकीं ll
भजि जो आदिपुरुखी l अखंडित ll

आणि ग्रंथोपजीविये l विषेशी लोकी इये l
दृष्टादृष्टविजये ll होआवे जी ll

येथ म्हणे श्रीविश्वेश्वराओ l आ होईल दान पसावो l
येणे वरे ज्ञानदेवो l सुखियां जाला ll

- श्री ज्ञानेश्वरमाऊली

पसायदानाबद्दल मी काय बोलू? माझी तेवढी झेप नाहीच! माझ्या मते पसायदानाची उंची ही केवळ अनुभवायची गोष्ट आहे. त्याची खोली हळूहळू समजू लागते. समजत आहे म्हणता म्हणता, हातातून कितीतरी संदर्भ निसटल्यासारखे वाटतात.

अत्यंत खडतर अश्या आयुष्याला सामोरं जाऊन, त्याला आपलंस करुन, त्या आयुष्याचं केवळ स्वतःपुरतंच नव्हे, तर येत्या कित्येक पिढ्यांसाठी लखलखणारं सोनं करुन ठेवलेल्या संतपुरुषाचे हे शब्द! इतक्या लहान वयात कुठून आली ही ऋजुता? इतके अन्याय सहन करुन एवढी कोवळीक कशी काय जपली ह्या माणसाने? म्हणून ज्ञानेश्वर ही माऊली का? जशी आईच्या मनात केवळ अपरंपार माया असते, तशीच सर्वांभूती जपलेली माया. विश्वाच्या आर्ताचे दु:ख जाणवणारं मन माउलीचंच असू शकत ना?