अनय  

Posted by यशोधरा in

नक्षत्रांच्या गावातून उतरली होतीस तू त्याच्या घरात;
मेघश्याम आभाळाची ओढ तुझ्या रक्तातच होती
हे समजलं होतं त्याला, अगदी पहिल्यापासून,
तुझ्या बाईपणाची जात विजेची, शेजेला घेता न येणारी
ओळखून होता तो आतून, आतून, खोल मनातून
तुझ्या झिळमिळ स्वप्नांच्या मोरपिसांना
त्याने कधी देऊ पाहिले नाहीत आपले डोळे,
आणि नाही गढूळ केले कधी तुझ्या देहात हिंदकळणारे
धुंदमदिर निळे तळे.

त्याच्या मृण्मय आयुष्यात उमटली होती
अमराचा अळता लावलेली तुझी पावले
घरात तुझ्या असण्याचा अविनाशी गंध होता;
काठोकाठ भरून होता तो नुसत्या तुझ्या आसपास वावरण्याने;
तुझ्याशी खोलवर कृतज्ञ होता
पाहिलं त्यानं तुला उंच बेभान उसळताना;
रात्रीच्या रसज्ञ काळ्या अंधारात मिसळताना;
मधुर विषाचे घोट खुळ्या ओठांनी आकंठ घेताना;
पिसावताना, रसावताना,
अस्तित्वाचा कण न्‌ कण
प्रेमाच्या चेहऱ्यावर उत्कट उधळून देताना.

कळली त्याला तहान तुझ्या तृप्तीला लागलेली अतृप्तीची;
दु:खाचं नख लागलेल्या काळजाची तडफड कळली शर्थीची;
कळली कशी असते प्रेमात स्त्री भरतीची आणि सरतीची.
तू हरलीस हे त्याला कळलं, पण निरर्थाच्या वाटेवर
हरवली नाहीस, स्वत्व सांभाळून उरलीस तशीच, हेही कळलं
त्यानं पुढे होऊन तुझ्या पापणीवरचा शोक टिपला,
त्या क्षणी, राधे तुला तुझा पुरुष भेटला.
पुरुष-जो क्षमा करून नाही ऋणी करत;
पाठ फिरवून नाही उणी करत;
घेतो समजून, सावरतो, आवरतो, उराशी धरतो;
आपल्या नसलेल्या स्वप्नांसाठीही आपल्या काळजाचं घर करतो.
राधे, पुरुष असाही असतो!

- अरुणा ढेरे, ’मौज दिवाळी’ २००४

राधा-कृष्णाच्या नात्यावर किती वेगवेगळ्या अंगांनी लिहिलं गेलंय, पण राधा आणि अनय? अनय हा राधेचा नवरा.

This entry was posted on बुधवार, २२ ऑक्टोबर, २००८ at बुधवार, ऑक्टोबर २२, २००८ and is filed under . You can follow any responses to this entry through the comments feed .

1 comments

पुरुष-जो क्षमा करून नाही ऋणी करत;
पाठ फिरवून नाही उणी करत;
घेतो समजून, सावरतो, आवरतो, उराशी धरतो;
आपल्या नसलेल्या स्वप्नांसाठीही आपल्या काळजाचं घर करतो.
राधे, पुरुष असाही असतो!



....अप्रतिम. खुप आवडली. धन्यवाद !

१२ जानेवारी, २००९ रोजी ४:३९ PM

टिप्पणी पोस्ट करा