भय इथले संपत नाही...  

Posted by यशोधरा in

भय इथले संपत नाही
मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो
तू मला शिकविली गीते

हे झरे चंद्रसजणांचे
ही धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण
झाडांत पुन्हा उगावाया

त्या वेली नाजूक भोळ्या
वारयाला हसवून पळती
क्षितिजांचे तोरण घेऊन
दारावर आली भरती

तो बोल मंद हळवासा
आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातील
जणू अंगी राघव शेला

देऊळ पलिकडे तरीही
तुज ओंजळ फुटला खांब
थरथरत्या बुबुळापाशी
मी उरला सुरला थेंब

संध्येतील कमल फुलासम
मी नटलो श्रृंगाराने
देहाच्या भवती रिंगण
घालती निळाईत राने

स्तोत्रात इंद्रिये अवघी
गुणगुणती दु:ख कुणाचे
हे सरता संपत नाही
चांदणे तुझ्या स्मरणाचे

ते धुके अवेळी होते
की परतायाची घाई
मेंदूतुन ढळली माझ्या
निष्पर्ण तरुंची राई

-कवि ग्रेस

अशी पाखरे येती  

Posted by यशोधरा in

अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवुनी जाती
दोन दिसांची रंगत संगत दोन दिसांची नाती

चंद्र कोवळा पहिलावहिला
झाडामागे उभा राहिला
जरा लाजुनी जाय उजळुनी काळोखाच्या राती

फुलून येता फूल बोलले
मी मरणावर हृदय तोलले
नव्हते नंतर परी निरंतर गंधित झाली माती

हात एक तो हळु थरथरला
पाठीवर मायेने फिरला
देवघरातिल समईमधुनी अजून जळती वाती

कुठे कुणाच्या घडल्या भेटी
गीत एक मोहरले ओठी
त्या जुळल्या हृदयांची गाथा सूर अजुनही गाती

गीत - मंगेश पाडगावकर

असेन मी..  

Posted by यशोधरा in

असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे
फुलाफुलांत येथल्या, उद्या हसेल गीत हे
हवेत ऊन भोवती सुवास धुंद दाटले
तसेच काहिसे मनी तुला बघून वाटले
तृणांत फूलपाखरू तसे बसेल गीत हे
स्वये मनात जागते न सूर ताल मागते
अबोल राहुनी स्वत: अबोध सर्व सांगते
उन्हे जळात हालती तिथे दिसेल गीत हे
कुणास काय ठाउके कसे कुठे उद्या असू ?
निळ्या नभात रेखली नकोस भावना पुसू
तुझ्या मनीच राहिले तुला कळेल गीत हे

- शांता शेळके

देखणे ते चेहरे  

Posted by यशोधरा in

देखणे ते चेहरे
जे प्रांजळाचे आरसे ।
गोरटे की सावळे
या मोल नाही फारसे ॥
तेच डोळे देखणे
जे कोंडीती सार्‍या नभा ।
वोळिती दुःखे जनांच्या
सांडिती नेत्रप्रभा ॥
देखणे ते ओठ की जे
ओविती मुक्ताफळॆ ।
आणि ज्यांच्या लाघवाने
सत्य होते कोवळे ॥
देखणे ते हात ज्यांना
निर्मितीचे डोहळे ।
मंगलाने गंधलेले
सुंदराचे सोहळॆ ॥
देखणी ती पाऊले
जी ध्यासपंथे चालती ।
वाळवंटातूनसुद्धा
स्वस्तिपद्मे रेखिती ॥
देखणे ते स्कंध ज्या ये
सूळ नेता स्वेच्छया ।
लाभला आदेश प्राणां
निश्चये पाळावया ॥
देखणी ती जीवने
जी तॄप्तीची तीर्थोदके ।
चांदणॆ ज्यातुन वाहे
शुभ्र पार्‍यासारखे ॥
देखणा देहान्त तो
जो सागरी सुर्यास्तसा ।
अग्निचा पेरुन जातो
रात्रगर्भी वारसा ॥

-बा. भ. बोरकर.