देखणे ते चेहरे  

Posted by यशोधरा in

देखणे ते चेहरे
जे प्रांजळाचे आरसे ।
गोरटे की सावळे
या मोल नाही फारसे ॥
तेच डोळे देखणे
जे कोंडीती सार्‍या नभा ।
वोळिती दुःखे जनांच्या
सांडिती नेत्रप्रभा ॥
देखणे ते ओठ की जे
ओविती मुक्ताफळॆ ।
आणि ज्यांच्या लाघवाने
सत्य होते कोवळे ॥
देखणे ते हात ज्यांना
निर्मितीचे डोहळे ।
मंगलाने गंधलेले
सुंदराचे सोहळॆ ॥
देखणी ती पाऊले
जी ध्यासपंथे चालती ।
वाळवंटातूनसुद्धा
स्वस्तिपद्मे रेखिती ॥
देखणे ते स्कंध ज्या ये
सूळ नेता स्वेच्छया ।
लाभला आदेश प्राणां
निश्चये पाळावया ॥
देखणी ती जीवने
जी तॄप्तीची तीर्थोदके ।
चांदणॆ ज्यातुन वाहे
शुभ्र पार्‍यासारखे ॥
देखणा देहान्त तो
जो सागरी सुर्यास्तसा ।
अग्निचा पेरुन जातो
रात्रगर्भी वारसा ॥

-बा. भ. बोरकर.

This entry was posted on शनिवार, २७ डिसेंबर, २००८ at शनिवार, डिसेंबर २७, २००८ and is filed under . You can follow any responses to this entry through the comments feed .

1 comments

देखणा देहान्त तो
जो सागरी सुर्यास्तसा । (७+८)
अग्निचा पेरुन जातो (८-७)
रात्रगर्भी वारसा
---

ही कविता 'देवप्रिया' नावाच्या वर्णिक छन्दात (गणवृत्तात) आहे. प्रत्येक ओळीत १५ वर्ण गा-ल-गा-गा क्रमाने येतात. (ल=लघु/र्‍हस्व, ग-गुरु/दीर्घ). तेव्हा १५ वर्णांची पूर्ण ओळ सलग द्‌यायला हवी, याचा कृपया विचार करणे. ती कधी ८+७ तर कधी ७+८ अशी विभागली तर छन्दाची निष्कारण मोडतोड होते.

४ मे, २०१० रोजी ६:५४ AM

टिप्पणी पोस्ट करा