मर्ढेकरांची एक कविता  

Posted by यशोधरा in

असे काही तरी व्हावे
अशी दाट होती इच्छा;
असे काही तरी झाले
पुरवितें तेंच पिच्छा

पैलथडी पिके अंबा
ऐलथडी हे शहारे
कुणा भाग्यवंतासाठी
मध्ये वाकतात वारे

ओल्या वाळूंतुन वर
येई रसाळ सुवास;
आणी मनांतील बिया
देती हळूच आळस

असे काहीसे होईल
अशी होती फार आशा;
असे काहीसे झालेले
पाहतांच थिजे भाषा

-बा. सी. मर्ढेकर

*ह्या कवितेचे शीर्षक कोणाला ठाउक असल्यास जरुर कळवावे, धन्यवाद.

संधीप्रकाशात..  

Posted by यशोधरा in

आयुष्याची आता झाली उजवण
येतो तो तो क्षण अमृताचा
जे जे भेटे ते ते दर्पणीचे बिंब
तुझे प्रतिबिंब लाडेगोडे
सुखोत्सवे असा जीव अनावर
पिंजर्‍याचे दार उघडावे

संधीप्रकाशात अजून जो सोने
तो माझी लोचने मिटो यावी
असावीस पास जसा स्वप्नभास
जीवी कासावीस झाल्याविना

तेह्वा सखे आण तुळशीचे पान
तुज्या घरी वाण नाही त्याची
तूच ओढलेले त्यासवे दे पाणी
थोर ना त्याहूनी तीर्थ दुजे

वाळल्या ओठां दे निरोपाचे फूल
भुलीतली भूल शेवटली

-बा. भ. बोरकर