Posted by यशोधरा

तळ्याकाठी गाती लाटा,
लाटांमध्ये उभे झाड.
झाडावर धीवराची,
हाले चोच लाल जाड.

शुभ्र छाती, पिंगे पोट,
जसा चाफ़ा यावा फ़ुली.
पंख जणू थंडीमध्ये,
बंडी घाली आमसुली.

जांभळाचे तुझे डोळे,
तुझी बोटे जास्वंदीची.
आणि छोटी अखेरची
पिसे जवस फुलांची.

गड्या पाखरा, तू असा
सारा देखणा रे कसा?
पाण्यावर उडताना,
नको मारू मात्र मासा.


कवितेचं नाव आणि कोणाची आहे ते कोणी सांगेल का कृपया?
धन्यवाद.