नुक्ता प्रारंभ  

Posted by यशोधरा in

आता आता तुझ्या गीतां नुक्ता प्रारंभ नुक्ता
शुभ्र शेजेभोती सांज मध्ये क्षीणमंद रिक्ता

कोणी पक्षी सांजकाळी सोबत अंतराळी सोडी
पानजाळीमध्ये आला किर्र शीळ घाली

देठालगतच्या पाना एकेक पाकळी लागे
ओठ विलग विलग शून्य दृष्टी तेवू लागे

सुखदु:खापार देश तिचा आहे तमापार
तिला नाही आता स्मृती डोळे अश्रूंहून दूर

पायांवीण प्रवासाची न्याहाळिते देवदिशा
चंद्र झुरे आता उरे कुडीतून कवडसा

आता आता तुझ्या गीतां नुक्ता प्रारंभ नुक्ता
काळरात्रींतून गात गाळ थेंब थेंब रक्ता..


-आरती प्रभु

वाटेपाशी..  

Posted by Unknown in

रात्र थांबवुनी
असेच उठावे
तुझ्यापाशी यावे
क्षणासाठी

डोळियांच्या व्हाव्या
वेड्या गाठीभेटी
आणि दिठी दिठी
शब्द यावे

तूही थेंब थेंब
शब्दापाठी द्यावा
अर्थ ओला व्हावा
माझ्यासाठी

आणि उजाडता
पाठीवर ओझे
वाटेपाशी तुझे
डोळे यावे

- ग्रेस

कवि आणि कविता  

Posted by यशोधरा in

"येशी सांग कुठून? दिव्य कविते! हे चित्कले सुंदरी?"
-- गा तेथून कवे! अनंत निजला जेथें तुझ्या अंतरीं

"तेथे शांति अगोचरा, मग मुखीं वाणी कशी सुस्वर?"
-- बन्सी देह मदीय, नित्य घुमवी श्वासेंच बन्सीधर

"ही ज्योतिर्मय भूषणें तनुवरी, कोणीं दिलीं आंदण?"
-- देहातील तुझ्या युगानुयुग जे, ती श्री तिचें हें धन

"केवीं आकळिशी अनंत गगनें पंखांविणें सत्वर?
कोठें पुण्यजलाशयी विहरुनी येशी क्षणाभीतर?"

-- गेले मानसहंस दिव्य उडुनी त्यांनी दिले जे पर
शीर्षींचे वर ते तुझ्या, जडवुनी मीं नेसलें अंबर

तेणें मी उडुनी जिथें अतिरसीं न्हातात व्यासादिक
तेथें शांत मनें विहार करितें मानून पुण्योदक

"केवीं गे मग साश्रु लोचन तुझें जेव्हा मुदें हांसशी
डोळ्यांनी हसतां, मुखावर कशी संध्याद्युति म्लानशी?"

-- रात्रीचा घन कृष्णकोष फुलतां तेजास येई भर
छाया भूमिवरी जशा पसरती जेंव्हा हसे भास्कर

लीला त्याचपरी करोनि तुजला मी प्रत्यहीं दावितें
कीं जें सत्य चराचरी विनटलें तूझेंच उद्बीज तें

"केवीं चिन्मय मोहिनी असुनिं तूं निर्लेप मांगल्य ही?"
-- मी भस्मासुर जाळितें हसुनियां नाचून गाऊनही

"मी गे अज्ञ असून केविं असशी तूं मात्र विद्यावती?"
-- भ्रांती तू मम, मी तुझी कविवरा ज्योतिष्मती जागृती

- बा. भ. बोरकर