अंतरिक्ष फिरलो, पण
गेली न उदासी
गेली न उदासी!
लागले न हाताला
काही अविनाशी
काही अविनाशी!
क्षितीज तुझ्या चरणांचे
दिसते रे दूर
दिसते रे दूर!
घेऊन मी चालू कसा
भरलेला ऊर
भरलेला ऊर!
जरी वाटे जड कळाले
तळ कळला नाही
तळ कळला नाही!
जड म्हणते "माझा तू"
क्षितिज म्हणे, "नाही"
क्षितिज म्हणे, "नाही!"
अंतरिक्ष फिरलो, पण
गेली न उदासी
गेली न उदासी!
- म. म. देशपांडे
अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून राहावे, मला वाटते
जिथे शांतता स्वतःच निवारा शोधीत थकून आली असते
जळाआतला हिरवा गाळ निळ्याशी मिळून असतो काही
गळून पडत असताना पान मुळी सळसळ करीत नाही
सावल्यांना भरवीत कापरे जलवलये उठवून देत
उगीच उसळी मारुन मासळी, मधूनच वर नसते येत
पंख वाळवीत बदकांचा थवा वाळूत विसावा घेत असतो
दूर कोपर्यात एक बगळा ध्यानभंग होऊ देत नसतो
हृदयावरची विचारांची धूळ हळूहळू जिथे निवळत जाते,
अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून राहावे, मला वाटते!
-अनिल
इथे रंगली पंगत
मिटक्यांची, भुरक्यांची;
साधासुधा माझा हात
बाळजीभ अमृताची;
इथे चालला अभ्यास
इथे झाली भातुकली
गोष्टी, गाणी नि मस्करी
खोली भरुन राहिली;
इथे घडले पतंग
इथे फिरला भोवरा
इथे हदगा मांडला
इथे खुडला मोगरा;
खेळा-शाळेच्या मागून
दूर दूर दिसाकाठी
सांजावता दारामध्ये
कमरेला घट्ट मिठी
दिसामाशी वाढताना
घर झाले हे लहान
पालवीत पंख नवे
गेली याच दारातून
सांज टळली, तरीही
दार लावावे वाटे ना
वळेल का कुणी मागे?'
डोळा वाटुली संपेना...
संपावया हवी वाट
लावायला हवा दिवा
पोटासाठी मुकाट्याने
हवा टाकायला तवा!
- इंदिरा संत
असे काही तरी व्हावे
अशी दाट होती इच्छा;
असे काही तरी झाले
पुरवितें तेंच पिच्छा
पैलथडी पिके अंबा
ऐलथडी हे शहारे
कुणा भाग्यवंतासाठी
मध्ये वाकतात वारे
ओल्या वाळूंतुन वर
येई रसाळ सुवास;
आणी मनांतील बिया
देती हळूच आळस
असे काहीसे होईल
अशी होती फार आशा;
असे काहीसे झालेले
पाहतांच थिजे भाषा
-बा. सी. मर्ढेकर
*ह्या कवितेचे शीर्षक कोणाला ठाउक असल्यास जरुर कळवावे, धन्यवाद.
आयुष्याची आता झाली उजवण
येतो तो तो क्षण अमृताचा
जे जे भेटे ते ते दर्पणीचे बिंब
तुझे प्रतिबिंब लाडेगोडे
सुखोत्सवे असा जीव अनावर
पिंजर्याचे दार उघडावे
संधीप्रकाशात अजून जो सोने
तो माझी लोचने मिटो यावी
असावीस पास जसा स्वप्नभास
जीवी कासावीस झाल्याविना
तेह्वा सखे आण तुळशीचे पान
तुज्या घरी वाण नाही त्याची
तूच ओढलेले त्यासवे दे पाणी
थोर ना त्याहूनी तीर्थ दुजे
वाळल्या ओठां दे निरोपाचे फूल
भुलीतली भूल शेवटली
-बा. भ. बोरकर
