१
माणसे रोजगारासाठी बाहेर पडल्यावर
दिवस मोहल्ल्यातल्या बायाबापड्यांचा,
गुलगुले विकल्यानंतरच्या
जब्बारच्या टोपलीसारखा.
मन भकास: लोडशेडिंग वेळेतल्या पिठगिरणीसारखे.
२
गरजाच्या चाकांनी धावणारे आयुष्य;
वाटा आव्हानांच्या नागमोडी;
विसावत नाही पळभरासाठी
लाकूड अपेक्षांचे भेदणारी कर्वत.
उजाडताच डोक्यांवर प्रश्नांचा पर्वत:
आदळाताहेत कोणत्या प्रदेशात ग्लोबली लाटा?
गेल्या नाहीत मोहल्ल्याला खेटून
बिगबाजाराच्या चकाचौंद वाटा.
३
न्याहाळतात बाया नजरेने अचंबित
उंच इमारतीवरच्या लबालब टाक्या,
चघळतात कुतूहलाने शॉवरच्या
थंड-गरम पाण्याच्या नळ्यांचा विषय.
गातात रांजणे कोरडी वाळवंटी गाणी:
येते आठवडा उलटल्यावर नळाला पाणी.
पडझड वारसाहक्काने आलेली,
प्रवास माहेर ते सासरपर्यंतचा,
दैन्याचा दारिद्र्याकडे मुक्काम,
उपासमारीचा रमझान रोज्याला सलाम.
दळणकांडण, भांडीकुंडी, धुणीधाणी, बाळंतपण
होत नाहीत जगण्याची मुळे पक्की;
गिळते स्वप्नांच्या पोष्टरला
वास्तवाची जळजळीत चिक्की.
४
वेस परिसरात सकाळी
टमरेल घेऊन जाणार्या बाया
पाने झडलेल्या एरंडासारख्या,
सांगतात पदराने डोळे पुसत
मारझोड दारुड्या नवर्याची,
छळवणूक सासरची जीवघेणी;
दाखवतात पाठीवरचे वळ काठीचे.
करते एक भार दुसरीचा हलका
खर्चून शब्द ठेवणीतले मायाळू;
दाटतो सांत्वन करणारीच्या डोळ्यांसमोर
पडदा धुक्याचा ओलसर.
५
तारुण्य बहरताना कोळपून गेलेले
जगणे वशिलाहीन विधवांचे होरपळून गेलेले,
निराधारांच्या तुटपुंज्या अनुदानासाठी
येरझारा तहसिलच्या मारणार्या
म्हातार्या मरणाला टेकलेल्या.
बंदुका कठोर शक्यतांकडे रोखलेल्या.
वागतो फटकून चंद्र पौर्णिमेचा,
पंख अमावस्येचे मोहल्लाभर पसरलेले.
६
काळजी जमान्याला शेअरबाजाराची,
वाहिन्यांच्या टीआरपीची,
स्टार्सच्या मानधनाच्या चढ-उतारांची.
बोकांडी प्राथमिक गरजांच्या स्कोअर क्रिकेटचा.
७
मोसमात पानगळीच्या वसंताचे कागदी नकाशे,
येताहेत कोणत्या वरातीसाठी डिजीटल ढोल-ताशे.
घेणार भरारी कशी पंखतुटले पक्षी?
कोरणार कोणत्या हातांवर ग्लोबल मेंदीची नक्षी?
- अजीम नवाज राही
नंदनने पाठवलेली, त्याला आवडलेली मौज २००८ दिवाळी अंकातली एक कविता.
काय करु शकाल तुम्ही तिच्यासाठी?
द्याल तिच्या तान्ह्या श्वासांना
जखमी न होता मोकळं जगण्याचं एक साधं आश्वासन?
तिचा वाढता बहर वेचण्यासाठी
उतावीळ तुमच्या अभिलाषा,
ठेवाल मुळाशी निरोगी माती घालण्याची मायेची आठवण?
स्वप्नचुटुक वाटेवर चालणारी
तिची तरुण नाचरी पावलं आणू शकाल माघारी,
तुम्ही पेरुन ठेवलेल्या स्फोटक आणि भयकारी वास्तवापासून?
अडवू शकाल तिच्या निरागस इच्छांवर
तुमच्या विषारी स्पर्धांच्या अग्निलोलकांतून कोसळणारं
संवेदनांची ओल गाभ्यापासून नष्ट करणारं उग्र आणि निर्मम ऊन?
रोजच्या रोज घरात बळी जाणारं
सोशिक विवाहितेचं कौमार्य कराल परत
तिच्या अनीह रतिकर्माची दु:सह आठवण पुसून?
उमलण्याच्या आणि दरवळ्ण्याच्या सगळ्या शक्यता सांभाळून
जडवाल तिला तिच्या इच्छांच्या सगळ्या कळ्या, पुन्हा फुलवून
ज्या गळून पडल्या तिच्या देहावरुन?
कसं काही करु शकाल तुम्ही तिच्यासाठी,
हजारो वर्षांच्या संकेताच्या झगमगीनं तुमचे डोळे दिपल्यानंतर?
आणि अंधारात पूर्ण जागी असलेली ती तर जाणूनच आहे
तुमचं मस्तक आणि हृदय यातलं अहंभावाचं अटळ अंतर...
-अरुणा ढेरे
गेले दोन पोस्ट्स गाण्यांचे टाकलेत. मागे पण एक टाकलं होतं.
गाणं होण्याआधी - गाण्याच्या शब्दांवर सूर, ताल यांचे संस्कार होण्याआधी त्याचे शब्द म्हणजे एक कविताच असते, अशी मी स्वत:ची समजूत काढली आहे, किंवा पळवाट शोधली आहे म्हणा हवं तर! :) कारण जितका अश्या काही शब्दांवर चढलेला स्वरसाज मला प्रिय आहे, तितकेच ते शब्दही जिवापाड आवडतात! म्हणून इथे पोस्टलेय.
चुकलेलं असेल तर जरा काणाडोळा करा, ही विनंती. :)
केतकीच्या बनी तिथे, नाचला गं मोर
गहिंवरला मेघ नभी, सोडला गं धीर
पापणींत साचले, अंतरात रंगले
प्रेमगीत माझिया, मनामनात धुंदले
ओठांवरी भिजला गं, आसावला सूर
भावफूल रात्रीच्या अंतरंगी डोलले
धुक्यातूनी कोणी आज, भावगीत बोलले
डोळियांत पाहिले, कौमुदींत नाचले
स्वप्नरंग स्वप्नीच्या, सुरासुरांत थांबले
झाडावरी दिसला गं, भारला चकोर
-अशोक परांजपे
अजुनी रुसून आहे, खुलतां कळी खुलेना
मिटले तसेच लोचन, कि पाकळी हले ना
समजुत मी करावी, म्हणुनीच तु रुसावे
मी हांस सांगताच, रडताहि तु हसावे
ते आज का नसावे, समजावणी पटेना
धरिला असा अबोला, कि बोल बोलवेना
का भावली मिठाची अश्रूंत होत आहे
विरणार सागरी ह्या, जाणून दूर राहे
चाले अटीतटीने सुटता अढी सुटेना
मिटवील अंतराला, ऐसी मिठी जुटे ना
कि गुढ काहि डाव, वरचा न हा तरंग
घेण्यास खोल ठाव, बघण्यास अंतरंग
रुसवा असा कसा हा ज्या आपले कळेना
अजुनी रुसून आहे, खुलतां कळी खुलेना
-अनिल
