पोरसवदा होतीस  

Posted by यशोधरा

पोरसवदा होतीस
कालपरवा पावेतो;
होता पायांतही वारा
कालपरवा पावेतो.
आज टपोरले पोट
जैशी मोगरीची कळी;
पडे कुशीतून पायीं
छोट्या जीवाची साखळी.
पोरसवदा होतीस
कालपरवा पावेतो;
थांब उद्याचे माऊली
तीर्थ पायाचे घेईतों!


-बा. सी. मर्ढेकर

*ह्या कवितेचे शीर्षक कोणाला ठाउक असल्यास जरुर कळवावे, धन्यवाद.

 

Posted by यशोधरा

सोन किनारले घन
वन फुलारले ऊन
चित्त मिनारले नभी
स्वर्ग सारांश होऊन

धून निळावली गाढ
नादी सुगंधाचे लाड
प्राणा फुटून पालवी
काया प्रकाशाचे झाड

अष्टभावात गारवा
मंद्र अभोगी मारवा
निवांताच्या घुमटीत
स्वस्थ घुमतो पारवा

-बा. भ. बोरकर

 

Posted by यशोधरा in

आत गोठलेले आसू,
वर विटलेले हसू,
ओठी आलेले, मावळे...
"थोडे नदीकाठी बसू"

घ्यावा कशाला मागोवा,
जीव अहंतेचा गोवा,
चार पावली यायचा,
वीस कोसांचा पस्तावा...

नदी रोडावली आहे,
खडे मात्र बोचायाचे,
रान राहिलेले नाही,
आता पान पाखरांचे...

वृथा सारवासारव,
फोल शब्दांची रांगोळी,
आता पाचोळ्यात जमा,
लय चुकलेल्या ओळी...

-बा.भ.बोरकर

वाट  

Posted by यशोधरा in

मला आवडते वाट वळणाची
दाट झाडीची नागमोडीची
ही अलिकडची,नदीच्या थडीची
मला आवडते वाट वळणाची

मला आवडते वाट वळणाची
सरघसरणीची पायफसणीची
लवणावरची पानबसणीची
मला आवडते वाट वळणाची

मला आवडते वाट वळणाची
अशी भुलकावणीची हुलकावणीची
निसर्गवेळूच्या* भर रानीची
मला आवडते वाट वळणाची

मला आवडते वाट वळणाची
जरा अडचणीची चढउतरणीची
घाटमाथ्याची ती पलीकडची
मला आवडते वाट वळणाची

मला आवडते वाट वळणाची
इथची तिथची कधी कुणीकडची
क्षितीजीकडची पुढची पुढची
मला आवडते वाट वळणाची

- अनिल

निसर्गवेळूच्या* - कवितेत हाच शब्द आहे का, ह्याबद्दल जरा शंका आहे, तरी माहित असल्यास जरुर सांगा ही विनंती. धन्यवाद.

अंतरिक्ष फिरलो पण..  

Posted by यशोधरा in

अंतरिक्ष फिरलो, पण
गेली न उदासी
गेली न उदासी!

लागले न हाताला
काही अविनाशी
काही अविनाशी!

क्षितीज तुझ्या चरणांचे
दिसते रे दूर
दिसते रे दूर!

घेऊन मी चालू कसा
भरलेला ऊर
भरलेला ऊर!

जरी वाटे जड कळाले
तळ कळला नाही
तळ कळला नाही!

जड म्हणते "माझा तू"
क्षितिज म्हणे, "नाही"
क्षितिज म्हणे, "नाही!"

अंतरिक्ष फिरलो, पण
गेली न उदासी
गेली न उदासी!

- म. म. देशपांडे