मेघदूत  

Posted by यशोधरा in ,

काही दिवसांपूर्वी मायाने, मला बा भ. ह्यांनी देवनागरीमध्ये शब्दबद्ध केलेले मेघदूत पाठवले. कधीपासूनचे वाचायचे होते. शांता शेळके ह्यांनी अनुवादित केलेले मेघदूत मी वाचले होते, पण बा. भ ह्यानी शब्दबद्ध केलेले वाचायचा योग आला नव्हता... आभार मानलेले मायाला आवडायचे नाही, म्हणून मानत नाही. :)

ह्या कवितांच्या ब्लॉगवर हे मेघदूत असावे आणि आमच्याबरोबर इतरांनीही ते वाचून आनंद लुटावा, हीच इच्छा. क्रमाक्रमाने, वेळ होईल तसं, मी आणि माया इथे लिहित जाऊ.

पूर्वमेघ

कोण्या यक्षाकडूनी घडूनी, काही कर्तव्यदोष
स्वामीशापे सखीविरही तो,गुंतला एक वर्ष
कंठी अस्तप्रभ दिवस तो, रामगिर्याश्रमात
सीतास्नाने जलशुचि जेथे, वृक्ष छायांर्द्र दाट

शैली त्या तो प्रणयी इतुका, काही मासांत भागे
की स्वर्णाचे वलय गळूनी, कोपरा थेट लागे
आषाडहच्या प्रथम दिवशी, टेकला अद्रिरेखे
दंताघाती समद गजसा, देखणा मेघ देखे

उत्कंठेने कनकपतिचा, दास कष्टे पुढे ये
अश्रू पोटी गिळूनी घडी तो, चिंतनाक्रांत राहे
होती चित्ती विचल सुखीही, पाहता मेघ जेथे
कंठक्षेमातुर सखि दुरी, कोण त्याची दशा ते

धाडू कांते कुशल, भिजल्या श्रावणी धीर द्याया
या भावे तो फुलुनी सजला,त्याजला आळवाया
वाही ताजी कुटजकुसुमे,कल्पिल्या अर्ध्यदाने
बोले शब्द स्मितमधुरसे,स्वागताच्या मिषाने

धूमज्योती पवन सलिलें, साठला मेघ कोठे?
आणि ज्ञानेंद्रियपटू जिवें, न्यायची गोष्ट कोठें!
औत्सुक्ये तो अवगणुनि हें, आळवी त्यास भावें
कामार्तांना जड अजड हे भान नोहे स्वभावें

येशी वंशा क्षितीविदितशा पुष्करावर्तकांच्या
इंद्राचा तू सचिव वरिशी वांच्छिल्या रुपरेषा
दुर्दैवी मी रमणीविरही आळवितो धनेशा!
अव्हेरावे खलऋण बरी सज्जनांची उपेक्षा

तप्तांचि तू कणव जलदा, प्रीतीसंदेश नेई
स्वामीक्रोधे सखीविलग मी पोळतो येथ पाही
यक्षेशाच्या नगर अलके जा जिथे हर्म्यकेंद्रे
बाह्योद्यानी हर उजळूनी क्षालितो भालचंद्रे

वातारूढा बघतिल तुला कुंतलाग्रेकरानें
उंचावोनि पथिकवनिता स्निग्ध आश्वासनानें
तू येता रें कवन विरही विस्मरेल प्रियेला?
माझ्या ऐसा खचित न कुणी दास होऊनि ठेला

संथे पंथे स्ववश पवनासंगती चालताना
वामांगाने घुमतिल तुझ्या चातकानंद ताना
गर्भाधानस्मृति उमलुनी व्योमलेखा बलाका
स्वांगें बंधो रचितिल तुला कंठरेखा सुरेखा

अंती तूतें खचित वहिनी एकनिष्ठा दिसेल
वेळोवेळीं दिन गणुनि जी सावरी जीववेल
स्त्रीचे प्रेमी हृदय विरहीं पुष्पसें ये गळाया
आशाबंधा वरिच बहुधा लागते सांवराया

आळंब्यांनी फुलवुनि करि सुप्रसू जो धरेतें
त्या त्वद्घोषा श्रवणसुभगा ऐकुनि फुल्ल चित्तें
पाथेयाला विसकिसलयें घेतले मानसाथी
कैलासान्ताप्रत तुज नभी हंस होतील साथी

आलिंगोनि जीवलग गिरी तुंग हा नीघ, भद्रा!
अंकी ज्याच्या रघुपतिपदें रेखिल्या वंद्य मुद्रा
जेंव्हा जेंव्हा विरह सरुनी त्या मिळें भेट तूझी
ढाळी तेंव्हा गहिवरुनी तो आंसवे उष्ण ताजीं

आधी ऐके सुखद तुज जो मार्ग सांगेन सोपा
त्यामागोनी परिस जलदा! श्राव्य माझ्या निरोपा
घ्यावा पंथी श्रमुनी शिणतां शैलशृंगी विसावा
स्त्रोतींचा नी कवळ हलका भागतां आकळावा

नेई वारा गिरिशिखर का या भ्रमे सिद्धमुग्धा
देखो जाता मुख उचलुनी विस्मिता नेत्रबद्धा
जा वेतांचे वन लुपुनि तूं लीलया उत्तरेतें
शुंडाघाती चुकवुनि सवें मानिल्या दिग्गजांतें

वाल्मीकाग्राहुनि मिसळुनी कोवळे रत्नराग
वाटे ये हा वर उसळुनी इंद्रचापांग भाग
तेणे श्यामा तनुस तुझिया लाभुनी ओप खूप
पिच्छें ल्याला दिसशील दुजा विष्णुसा गोपरूप

भूलीला ज्या कृषिवलवधू नेणती कांहि जात्या
भोळ्या भावें तुजसी बघता आर्जवे अन्नदात्या
मालक्षेत्रीं चढुनि कसिल्या गंध भूमीवरून
डावा थोडा वळुन झणिं जा उत्तरेला निघून

मार्गी दावानाल विझवुनी पावतां क्लेश कष्ट
आनंदाने धरिल तुजला मस्तकी आम्रकूट
आल्या मित्रा मुख न चुकवी क्षुद्र ही पांग फेडी
या थोराची किति मग कथूं स्नेह-आतिथ्य-गोडी

पक्वाम्री जो भरुन उजळी अंग अंगी सुवर्ण
तत्शृंगी तू बसशिल जधीं स्निग्ध केशांगवर्ण
पृथ्वीचा त्या स्तन समजुनी रम्य कृष्णाग्र गौर
स्वर्गीची रे अमरमिथुनें तोषवीतील नेत्र

जेथें कुंजी रमति शबरी स्वल्प तूं थांब तेथ
वर्षावान्ती त्वरित पुढचा लंघुनी जाई पंथ
वारे विंध्याचलपदि दिसे अष्मखंडे विशीर्ण
भासे फेनें करिवरिल जी पत्रवल्ली प्रसन्न

जंबूकुंजी स्थिर जल तिचे प्राशुनी पुष्ट होई
तेथे त्याला वनगजमदे उग्र सौगंध येई
अंतःसारा! कवण पवना भार तोलेल सांग
संपन्नांना वजन असतें, खंगलेल्यांस पांग

...अपूर्ण

केव्हा कसा येतो वारा  

Posted by माया

केव्हा कसा येतो वारा
जातो अंगाला वेढून
अंग उरते न अंग
जाते अत्तर होऊन ॥
खाली सुगंधित तळे
उडी घेतात चांदण्या
हेलावल्या सुवासात
कशा डुंबती चिमण्या ॥

- इंदिरा संत