हिरवें तळ कोंकण  

Posted by Unknown

सह्याद्रीच्या तळी शोभते हिरवें तळ कोंकण
राष्ट्रदेवीचे निसर्गनिर्मित केवळ नंदनवन .. १

झुळझुळ गाणे मंजुळवाणे गात वाहती झरे
शिलोच्चयातुनि झुळझुळ येथेगंगाजळ पाझरे .. २

खेळतखिदळत नद्या चालल्या गुणगंभीराकडे
दरिखोर्‍यातुन माणिकमोती फुलुनि झाकले खडे .. ३

नील नभी घन नील बघुनि करि सुमनीं स्वागत कुडा
गोमेदांच्या नटे फुलांनी बरसातिंत तेरडा .. ४

कडेकपारी खेळ मारुतासह खेळे हिरवळ
उधळित सोने हसें नाचरें बालिश सोनावळ .. ५

शारदसमयी कमलवनाच्या तरत्या शय्येवरी
मदालसा स्वच्छंद लोळती जलदेवी सुंदरी .. ६

कविकाव्यांतुनि तशी जींतुनि स्रवते माध्वी झरी
आमोदा उधळीत फुले तीं बकुळीची मंजिरी .. ७

हिरव्या पिवळ्या मृदुल दलांच्या रम्य गालिच्यावरी
स्वप्नी गुंगती गोकर्णीचीं फुले निळीं पांढरीं .. ८

वृक्षांच्या राईंत रंगती शकुंत मधु गायनीं
तरंगिणीच्या तटीं डोलती नाग केतकीवनीं..९

फूलपांखरांवरुनि विहरती पुष्पवनांतिल परी
प्रसन्नता पसरीत वाजवुनि जादूची पांवरी..१०

शिताबाइच्या गोड हातचें पोहे जे काननीं
रागाने दे बाइलवेडा कवडा भिरकावुनी..११

रोपें त्यांचि बनुनि पसरलीं नाचत चोहींकडे
अजुनि पहा या! मंडित त्यांनी कोंकणचे हे सडे!..१२

इतिहासाला वार्ता ज्याची श्रत नाही जाहली
दंतकथांसहि विस्मृती ज्याची होउनियां राहिली..१३

"झिम्मा खेळे कोंकणचा तो नृपाळ" म्हणती मुली
गळे वसंती टपटप जेंव्हा आंब्याची डाहळी..१४

पिकले आंबे गळुनि भूतळी रस जोवरि वाहतो
वनदेवीसह झिम्मा खेळत नृप तोवरि राहतो..१५

कुठे आढळे फळभाराने लवलेली आवळी
कुठे गाळती भुळभुळ अपुली पक्वफळे जांभळी..१६

कुठे हलवितो पिंपळपाने पिंपळ पारावर
कुठे वडाच्या पारंबीवर झोके घे वानर..१७

कुठे बेहड्यावरि राघूस्तव विरही मैना झुरे
प्राणविसांवा परत न आला म्हणुनि चित्त बांवरे..१८

मधमाश्यांची लोंबति पोळी कुठे सात्त्विणावरी
रंग खेळती कुठे प्रमोदें पांगारे शेवरी..१९

पोटीं साखरगोटें परि धरि कंटक बाहेरुनी
कुठे झुले तो फणस पुरातन रहिवासी कोंकणी..२०

कोठे चिंचेवर शठ आंबा करि शीतळ सांउली
म्हणुनि कोपुनि नदीकिनारी रातांबी राहिली..२१

निर्झरतीरी रानजाईच्या फुलल्या कुंजांतुनी
उठे मोहमय संगीताचा अस्फुट कोठें ध्वनी..२२

कुठे थाट घनदाट कळकिचा त्यांत संचरे कुणी
पुंगी बजावित फंदि मुशाफिर दर्यापुर सोडुनी..२३

कुठे सुरंगी मुकुलकुलाच्या सस्मित वदनांतुनी
दरवळलेला परिमळ सेवित फिरति अप्सरा वनीं..२४

कोरांटीची, नादवटीची शेवाळीची फुलें
फुलुनि कुठें फुलबाग तयांनी अवघे शृंगारिले..२५

नीललोचना कोंकणगौरी घालुनि चैत्रांगणी
हिंदोळ्यावरि बसविति जेंव्हा अंबा शुभदायिनी..२६

हळदीकुंकू तदा वाटितां नसो प्रसादा उणें
पिकलीं म्हणुनी रानोरानी करवंदे तोरणें..२७

औदुंबरतरू अवधूताचा छाया दे शीतळ
शिवयोग्याचा बेल वाढवी भावभक्तीचे बळ..२८

बघुनि पांढरी भूतपाळ वेताळ काढितो पळ
आइन-किंजळ करिती मांत्रिकमंत्रबळा दुर्बळ..२९

गडागडावर निवास येथे मायभवानी करी
राही उधळीत फुले तिचे खुरचांफा चरणांवरी..३०

पानफुलांच्या वाहुनि माळा अंजनिच्या नंदना
तिजवर वरुनि वैधव्याच्या रुइ चुकवी यातना..३१

चिंव चिंव शब्दा करित निंवावर खार भराभर पळे
भेंडि उंडिणींवरी बैसुनी करकरती कांवळें..३२

लज्जारंजित नवयुवतीच्या कोमल गालांसम
रंगुनि काजू भरले त्यांनी डोंगर हे दुर्गम..३३

तिथे मंडलाकार मनोहर नर्तन आरंभुनी
रुसल्या सखिची घुमत पारवा करतो समजावणी..३४

विविध सुवासी हिरवा चांफा चकित करी मानस
मंद मंद मधु गंध पसरितो भुइचांफा राजस..३५

हसे उपवनीं अर्धोन्मीलित सुवर्ण चंपककळी
पाडुनि तुळशीवरी चिमुकली हलती निज सांउली..३६

पराग पिवळे, धवल पांकळ्या परिमळ अंबर भरी
घालित रुंजी भ्रमती भृंग त्या नागचंपकावरी..३७

सौगंधिक उच्छ्वास सोडिती प्राजक्ताच्या कळ्या
लाजत लाजत हळुच उघडिता निज नाजुक पांकळ्या..३८

त्या उच्छ्वासा पिउनी बिजेचा चांद हर्षनिर्भरी
होऊनिया बेभान नाचतो निळावंतिच्या घरी..३९

धुंद सिंधुला मारवेलीची मर्यादा घालुन
उभी सैकती कोंकणदेवी राखित तळकोंकण..४०

निकट माजली निवडुंगाची बेटे कंटकमय
आश्रय ज्यांचा करुनि नांदिती कोचिंदे निर्भय..४१

मागे त्याच्या डुले नारळी-पोफळिचे आगर
पुढे विराजे निळावतीचे निळेची जळमंदिर..४२

राष्ट्रदेवीचे निसर्गनिर्मित ऐसे नंदनवन
सह्याद्रीच्या तळी शोभते हिरवें तळ कोंकण!

- कवी माधव

This entry was posted on शुक्रवार, १६ डिसेंबर, २०११ at शुक्रवार, डिसेंबर १६, २०११ . You can follow any responses to this entry through the comments feed .

0 comments

टिप्पणी पोस्ट करा