आता आता तुझ्या गीतां नुक्ता प्रारंभ नुक्ता
शुभ्र शेजेभोती सांज मध्ये क्षीणमंद रिक्ता
कोणी पक्षी सांजकाळी सोबत अंतराळी सोडी
पानजाळीमध्ये आला किर्र शीळ घाली
देठालगतच्या पाना एकेक पाकळी लागे
ओठ विलग विलग शून्य दृष्टी तेवू लागे
सुखदु:खापार देश तिचा आहे तमापार
तिला नाही आता स्मृती डोळे अश्रूंहून दूर
पायांवीण प्रवासाची न्याहाळिते देवदिशा
चंद्र झुरे आता उरे कुडीतून कवडसा
आता आता तुझ्या गीतां नुक्ता प्रारंभ नुक्ता
काळरात्रींतून गात गाळ थेंब थेंब रक्ता..
-आरती प्रभु
"येशी सांग कुठून? दिव्य कविते! हे चित्कले सुंदरी?"
-- गा तेथून कवे! अनंत निजला जेथें तुझ्या अंतरीं
"तेथे शांति अगोचरा, मग मुखीं वाणी कशी सुस्वर?"
-- बन्सी देह मदीय, नित्य घुमवी श्वासेंच बन्सीधर
"ही ज्योतिर्मय भूषणें तनुवरी, कोणीं दिलीं आंदण?"
-- देहातील तुझ्या युगानुयुग जे, ती श्री तिचें हें धन
"केवीं आकळिशी अनंत गगनें पंखांविणें सत्वर?
कोठें पुण्यजलाशयी विहरुनी येशी क्षणाभीतर?"
-- गेले मानसहंस दिव्य उडुनी त्यांनी दिले जे पर
शीर्षींचे वर ते तुझ्या, जडवुनी मीं नेसलें अंबर
तेणें मी उडुनी जिथें अतिरसीं न्हातात व्यासादिक
तेथें शांत मनें विहार करितें मानून पुण्योदक
"केवीं गे मग साश्रु लोचन तुझें जेव्हा मुदें हांसशी
डोळ्यांनी हसतां, मुखावर कशी संध्याद्युति म्लानशी?"
-- रात्रीचा घन कृष्णकोष फुलतां तेजास येई भर
छाया भूमिवरी जशा पसरती जेंव्हा हसे भास्कर
लीला त्याचपरी करोनि तुजला मी प्रत्यहीं दावितें
कीं जें सत्य चराचरी विनटलें तूझेंच उद्बीज तें
"केवीं चिन्मय मोहिनी असुनिं तूं निर्लेप मांगल्य ही?"
-- मी भस्मासुर जाळितें हसुनियां नाचून गाऊनही
"मी गे अज्ञ असून केविं असशी तूं मात्र विद्यावती?"
-- भ्रांती तू मम, मी तुझी कविवरा ज्योतिष्मती जागृती
- बा. भ. बोरकर
तळ्याकाठी गाती लाटा,
लाटांमध्ये उभे झाड.
झाडावर धीवराची,
हाले चोच लाल जाड.
शुभ्र छाती, पिंगे पोट,
जसा चाफ़ा यावा फ़ुली.
पंख जणू थंडीमध्ये,
बंडी घाली आमसुली.
जांभळाचे तुझे डोळे,
तुझी बोटे जास्वंदीची.
आणि छोटी अखेरची
पिसे जवस फुलांची.
गड्या पाखरा, तू असा
सारा देखणा रे कसा?
पाण्यावर उडताना,
नको मारू मात्र मासा.
कवितेचं नाव आणि कोणाची आहे ते कोणी सांगेल का कृपया?
धन्यवाद.
काही दिवसांपूर्वी मायाने, मला बा भ. ह्यांनी देवनागरीमध्ये शब्दबद्ध केलेले मेघदूत पाठवले. कधीपासूनचे वाचायचे होते. शांता शेळके ह्यांनी अनुवादित केलेले मेघदूत मी वाचले होते, पण बा. भ ह्यानी शब्दबद्ध केलेले वाचायचा योग आला नव्हता... आभार मानलेले मायाला आवडायचे नाही, म्हणून मानत नाही. :)
ह्या कवितांच्या ब्लॉगवर हे मेघदूत असावे आणि आमच्याबरोबर इतरांनीही ते वाचून आनंद लुटावा, हीच इच्छा. क्रमाक्रमाने, वेळ होईल तसं, मी आणि माया इथे लिहित जाऊ.
पूर्वमेघ
